अशा पद्धतीने कमी खर्चात बनवा पाण्याची टाकी

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाचं पाणी साठवून वर्षभर वापरायचं असेल तर पाणी साठवण्यासाठी कशा प्रकारच्या टाक्या वापरायच्या याचा विचार करायला हवा. सर्वसाधारणतः विटा आणि सिमेंटची टाकी बांधायचे म्हटले किंवा प्लास्टिकची टाकी वापरायची म्हटली तर त्याचाच खर्च इतका येतो की नको ते पाणी साठवण असं वाटायला लागतं. हाच विचार करून आरती संस्थेने पाणी साठवण्याची टाकी बनवण्याची एक सोपी पद्धत विकसित केली आहे.

टाकी बनविण्याची पद्धत

सुमारे दहा हजार लिटर क्षमतेच्या या टाकीचा खर्च फक्त पंधरा हजार रुपये एवढाच येतो. ही टाकी बांधण्यासाठी सुमारे साडेतीन मीटर व्यासाचा जमिनीच्या वर सुमारे १५ ते २० सेंमी उंचीचा सिमेंटचा गोल चौथरा बांधून घ्यावा.

चौथारा बांधत असतानाच त्याच्या परिघावर दर ३० सेंमी वर एक याप्रमाणे बांबूच्या काठा उभ्या कराव्यात. काठी उपसून येऊ नये यासाठी तिला तळाकडील बाजूला एक आडवं छिद्र पाडून त्यातून लोखंडाची सुमारे १५ सेंमी लांब व १ सेंमी व्यासाची शीग ओवावी.

बांबूची एकूण लांबी १५० सेंमी असून त्यापैकी ३० सेंमी सिमेंटचा कट्टा व जमीन यांच्यात मिळून गाडलेले असावेत. उरलेले १२० सेंमी कट्ट्याच्या वर असावेत.

अशा तऱ्हेने बनलेल्या बांबूच्या कुंपणाच्या आत १२० सेंमी पन्ह्याचा गॅल्व्हनाईज केलेला २० गेजचा पत्रा बसवावा. या रचनेत पॉलिथिनचे जलाभेद्य कापड बसवले की झाली टाकी तयार.

ज्या ठिकाणी सुमारे १५० सेमी पाऊस पडतो त्या ठिकाणी ही टाकी पावसाच्या पाण्यानेच भरता येईल. पण जिथे कमी पाऊस पडतो तिथे ही टाकी छपराचे पाणी गोळा करून साठवायला वापरता येईल.

टाकी पाण्याने भरल्यावर तिच्यावर काळा पारदर्शक प्लास्टिक कापडाचा दादरा बांधून टाकला की पाणी वर्षभर टिकते. पावसाचे पाणी गोळा करून साठवून ठेवण्याच्या अशा तंत्रांना पाण्याचा काटकसरीने वापर करायच्या सोवयीची जोड दिली तर, पाणीटंचाईच्या समस्येवर मात करणे अवघड नाही

See also  बौद्ध दार्शनिक जन कवि बाबा नागार्जुन की 24 वीं पूण्यतिथि पर विशेष

स्त्रोत ः पुस्तिका- अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) ने विकसित केलेली तंत्रे

Leave a Comment