हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत कारण कांद्याला अगदी कवडीमोल दर बाजारात मिळतो आहे. अशातच नाफेडने कांदा खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत कांदा खरेदी बंद केली आहे. नाफेडने कांदा खरेदी पुन्हा सुरु करावी असे मत राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट मधून व्यक्त केले आहे.
केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण लहरी
राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटले आहे की, भारताचा सर्वाधिक कांदा हा बांग्लादेश आणि श्रीलंकामध्ये निर्यात होत होता. विशेषत: बांग्लादेश भारताच्या एकुण कांद्याच्या निर्यातीच्या ६० टक्के कांदा खरेदी करत होता. परंतु केंद्र सरकारचे आयात निर्यात बाबतींचे लहरी धोरण अचानक निर्यात बंदी लावणे यासारख्या प्रकारास कंटाळून भारताला अद्दल घडविण्यासाठी म्हणून भारतीय कांद्याच्या आयातीस वेगवेगळे निर्बंध लावून भारताचा बांग्लादेशमध्ये आयात होणार नाही याची दक्षता घेतली व इराककडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केला. आपले एक हक्काची बाजारपेठ गमावून बसलो श्रीलंकेतील अंतर्गत यादवीमुळे तिथेही निर्यात बॅन आहे.
तरच कांदा उत्पादकांना न्याय मिळेल
तशातच दुष्काळात १३ वा महिना या म्हणीप्रमाणे नाफेडने कांदा खरेदी बंद करून आपलाच खरेदी केलेली कांदा स्थानिक बाजारात विकायला सुरू केली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव धडाधड कोसळू लागले आहेत. केंद्र सरकारला आता खडबडून झोपेतून जागे व्हावे आणि नाफेडच्या कांदा विक्री बंद करून खरेदी सुरू करावी अजून अडीच लाख टन कांदा खरेदी करावा आणि बांग्लादेश जर आमचा कांदा घेणार नसेल कांद्याच्या निर्यातीस अडथळा आणत असेल तर बांग्लादेशातून आयात होणा-या कापड आणि तयार कपड्यांच्या आयातीत अडथळा निर्माण करावेत तरच ख-या अर्थाने कांदा उत्पादकांचे न्याय मिळेल.