हॅलो कृषी ऑनलाईन : शरद पवार ज्यावेळी देशाचे कृषीमंत्री होते, त्यावेळी एक कॉल केली की लगेच कांदा निर्यात खुली व्हायची. आता मात्र, आपल्याला कोणी वाली नसल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाहीत, आपण खाणार काय? असा खडा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. अजित पवार हे दौंड तालुक्यातील पारगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
सध्या दुधाला चांगला दर मिळत आहे. पण निर्मळ दूध द्या. कोणतीही भेसळ करु नका असे आवाहन देखील अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केलं. आपण अंबालिका कारखान्याची कॅपेसिटी वाढवली आहे. त्यामुळं जिथे ऊस लावायचा आहे तिथे लावा. जिथे कांडे लावायची आहे तिथे लावा. जो कारखाना चांगला भाव देईल आणि ज्याचा काटा चांगला असेल त्याला ऊस द्या असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीत आला होता. तो आम्ही ताब्यात घेतला. त्यावेळी साहेब आम्हाला म्हणाले की, कशाला घेतला. आता तोच कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये असल्याचे अजित पवार म्हणाले. दौंड तालुक्यात 700 मतांनी आमचा उमेदवार पाडला. तुम्ही मला ताकद दिली की मला काम करायला हुरूप येतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवार म्हणाले, शेतकरी कधी संपावर जात नाहीत. त्याच्या पोटाला पिळ बसला तर अडचणी येतो. याचा विचार सरकारने करावा, असे पवार म्हणाले. नवीन सरकार आल्यापासून राज्यात रोज तीन ते चार शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाऊस पडून देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी या सरकारला वेळ नाही. ते केंद्राकडे बघतात असेही पवार म्हणाले. दौंडमध्ये ऊस जास्त आहे. भीमा पाट्स कारखाना सुरुवातीला चांगला चालला, आता तर 2 वर्ष झालं बंदच आहे. यावेळी बोलताना एकाने टाळ्या वाजवल्या, यावेळी टाळ्या काय वाजवतो कपाळ माझं असं अजित पवार म्हणाले. 21 वर्ष झालं राहुल कुल यांच्या हातात साखर कारखाना आहे. राहुल कुलला विचारा अनेकदा मी त्याला मदत केली आहे. जिल्हा बँकेने 38 कोटींची सवलत दिली आहे. ही सवलत दुसरी कोणी दिली नसती असेही अजित पवार म्हणाले.
संदर्भ : एबीपी माझा