हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या द्राक्ष लागवडीखालील प्रत्येक भागात सतत पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. या वातावरणामध्ये जमिनीतील वाफसा परिस्थिती अजूनही आलेली नाही. कमी झालेले तापमान, वाढत असलेली आर्द्रता आणि त्यामुळे वेलीमध्ये होत असलेल्या विपरीत घडामोडी आणि फळछाटणीच्या सद्यःस्थितीचा विचार करता खालील अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
१) काडी परिपक्वता
मागील आठवड्यामध्ये बागेतील वातावरण मोकळे असल्यामुळे काही भागांत काडी कच्ची असलेल्या ठिकाणी कोरड्या वातावरणामुळे परिपक्वता होण्यास सुरुवात झाली होती. मात्र सध्या पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे काडी परिपक्वता लांबणीवर जाण्याची शक्यता असेल. या वेळी जमिनीत वाफसा असल्यास पालाशची उपलब्धता जमिनीतून आणि फवारणीच्या माध्यमातून करावी. उदा. ०-०-५० सुमारे दीड किलो प्रति एकर या प्रमाणे एक आठवडा रोज द्यावे. किंवा ०-९-४६ एक किलो या प्रमाणे आठ ते दहा दिवस द्यावे. ज्या बागेत वाफसा आलेला नाही, बोदामध्ये जास्त प्रमाणात पाणी साचलेले आहे अशा ठिकाणी फक्त फवारणीच्या माध्यमातून पूर्तता करावी. पानाची परिस्थिती पाहून फवारणीची मात्रा व संख्या कमी अधिक करावी. साधारण परिस्थितीमध्ये ०-०-५० चार ते पाच ग्रॅम किंवा ०-९-४६ तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पाच ते सहा फवारण्या आवश्यक असतील. नवीन फुटी निघत असल्यास शेंडा पिंचिंग करून घेणे फायद्याचे असेल. ढगाळ वातावरण जास्त काळ टिकून राहिल्यामुळे वेलीला आवश्यक तितका सूर्यप्रकाश मिळालेला नसेल, याकरिता काड्या एकमेकांवर येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तारेवर काड्या व्यवस्थित बांधून घ्याव्यात
२) नुकतीच फळछाटणी झालेली बाग
बऱ्याचशा बागेत फळछाटणी होऊन सध्या पोंगा अवस्था दिसून येईल. या कालावधीमध्ये खरेतर वातावरण कोरडे असणे गरजेचे असते. कोरड्या वातावरणात वेलीची वाढ नियंत्रणात असते. मात्र या पोंगा अवस्थेत ज्या भागात पाऊस झाला किंवा सुरू आहे, अशा स्थितीमध्ये वेलीमध्ये शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढतो. परिणामी वाढ जास्त प्रमाणात होताना दिसते. पोंगा अवस्थेत वेलीचा जोम जरी दिसत नसला तरी त्याचे परिणाम चार ते पाच पाने अवस्थेत लगेच दिसून येतात. वातावरणातील झालेल्या बदलामुळे वाढीचा जोम वाढून या वेळी निघत असलेला द्राक्षघडाचे रूपांतर बाळीमध्ये होण्याची समस्या दिसून येते. काही परिस्थितीत गोळीघडही तयार होताना दिसतील. ज्या बागेत मुळांच्या कक्षेत पाणी जास्त प्रमाणात साचलेले आहे, अशा बागेत निघत असलेला घड पांढरा दिसून येईल. किंवा निघालेली फूटही पिवळ्या रंगाची दिसेल. या वेळी बागेत फारसे करता येत नसले तरी वाढीचा जोम नियंत्रणात ठेवण्यासाठी पालाशयुक्त खतांचा वापर जमिनीतून तसेच फवारणीच्या माध्यमातून करता येईल. या सोबत संजीवकांची फवारणीही तितकीच महत्त्वाची असेल. या वेळी घड जिरण्याची समस्या रोखण्यासाठी ६ बीए १० पीपीएम प्रमाणे करता येईल. बऱ्याचदा बागायतदार पोंगा अवस्था सुरू होण्यापूर्वीपासूनच ६ बीए व पालाशची फवारणी सुरू करतात. यावेळी डोळा फुगलेला असून केवळ कापसलेला असतो, त्यामुळे आपण करत असलेल्या फवारणीचे परिणाम मिळत नाहीत. पोंग्यातून एक ते दीड पान जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत फवारणीचे परिणाम मिळत नाहीत. यासाठी केलेली फवारणी पानाने शोषून डोळा फुटण्याची गरज असते. तेव्हा बागेतील परिस्थिती पाहून डोळ्यातून पान बाहेर निघाल्यानंतरच फवारणी करावी. पालाशची फवारणी करताना त्याचे प्रमाण फार कमी ठेवावे. उदा. अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी वाढीच्या या अवस्थेत पुरेसे होईल. खताच्या फवारणीची मात्रा वाढवण्यापेक्षा फवारण्यांची संख्या वाढविल्यास परिणाम चांगले मिळतील. या पूर्वी बागेत दोन ओळींच्या मध्य भागात चारी घेतलेली असल्यास बोद लवकर मोकळे होतील. वाफसा असलेल्या परिस्थितीत जमिनीतून खतांचा वापर (मॅग्नेशिअम आणि फेरस) करता येईल.