पूर्णाथडी म्हशीला मिळाले राष्ट्रीय मानांकन

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय कृषी संशोधन केंद्रांतर्गत राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्युरो, कर्नाल यांच्या वतीने नुकत्याच भारतातील नवीन नोंदणीकृत पशुधनाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात पश्‍चिम विदर्भातील पूर्णाथडी म्हशीला राष्ट्रीय मान्यता देण्यात आली आहे. ‘माफसू’च्या शास्त्रज्ञांनी या म्हशीचा अभ्यास करून प्रस्ताव दिला होता.

पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट राखाडी रंगाच्या म्हशीला राजाश्रय मिळावा, तिची स्वतंत्र ओळख असावी, या उद्देशाने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. तो आता मार्गी लागला आहे.

पूर्णाथडी म्हशीची वैशिष्ट्ये

– पारंपरिक जात म्हणून ओळख

– रंगाने फिकट राखाडी

– पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांतील पूर्णा नदीकाठच्या भागांत विशेषत्वाने आढळते.

– स्थानिक पातळीवर भुरी, राखी, गावळी या नावांनी ओळख

– मध्यम आकारमान, दुधातील स्निग्धाचे उच्च प्रमाण, उत्तम प्रजनन क्षमता, कमी व्यवस्थापन खर्च

– विदर्भातील उष्ण हवामानात तग धरून राहण्याची क्षमता

पूर्णाथडीची पैदासक्षेत्रे

पश्‍चिम विदर्भात अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांतून वाहणाऱ्या पूर्णा नदीकाठच्या परिसरात या भुऱ्या रंगाच्या म्हशी आढळतात. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर, अचलपूर व अंजनगावसूर्जी, अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा व अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांतील शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुके, तसेच लगतची गावे हे पूर्णाथडी म्हशीचे पैदासक्षेत्र म्हणता येईल.

विशेष गुणधर्मामुळे लघू आणि मध्यम म्हैसपालकांमध्ये ही म्हैस विशेष लोकप्रिय आहे. पूर्णाथडी म्हैस दिवसाला साधारणतः ४ ते ५ लिटर दूध देते. एका वेतात (सरासरी २५० दिवस) १००० किलोग्रॅम दूध देते. दोन वेतांतील अंतर सरासरी ४५० दिवस आहे. पहिल्यांदा विण्याचे वय हे साधारण ५ वर्षे एवढे आढळते. पूर्णाथडीच्या दुधात स्निग्धाचे प्रमाण सरासरी ८.५ टक्के आहे. त्यामुळे स्थानिक म्हैसपालकांनी पूर्णाथडी म्हशीस निवड करण्यास नेहमीच झुकते माप दिले आहे.

संदर्भ -ऍग्रोवन

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *