हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरिपातील पिके आता काढणीला आली आहेत. आता लावकारच शेतकरी रब्बी पिकांच्या लागवडीकडे लक्ष घालायला सुरुवात करतील. आजच्या लेखात आपण जाणून घेउया रब्बी ज्वारी चे वाण आणि पेरणीबाबत माहिती…
रब्बी ज्वारी:
१) हलक्या जमिनीत (खोली ३० सें.मी पर्यंत) फुले यशोमती, फुले अनुराधा, फुले माऊली या जातींची निवड करावी.
२) मध्यम जमिनीत (खोली ६० सेंमी.पर्यंत) फुले सुचित्रा, फुले चित्रा, फुले माउली, परभणी मोती, मालदांडी ३५-१ या जातींची निवड करावी.
३) भारी जमिनीत (खोली ६० सेंमी.पेक्षा जास्त) फुले वसुधा, फुले यशोदा, सीएसव्ही-२२, पीकेव्ही-क्रांती, परभणी मोती आणि संकरित जाती ः-सीएसएच १५, सीएसएच १९, या जातींचा वापर करावा.
४) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधकाची (३०० मेष) प्रक्रिया करावी. त्यामुळे काणी रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर आणि २५० ग्रॅम पीएसबी या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
५) पेरणी १५ सप्टेंबरच्या अगोदर किंवा १५ ऑक्टोबरनंतर केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून ज्वारीची पेरणी योग्य वेळी करावी.
६) पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरावी. एकाच वेळी खत व बियाणे पेरावे. कोरडवाहू क्षेत्रात ४५ × १५ – २० सेंमी अंतरावर पेरणी करावी. हेक्टरी १० ते १२ बियाणे पेरणीसाठी पुरेसे होते.
७) कोरडवाहू क्षेत्रातील हलक्या जमिनीत पेरणी करते वेळी हेक्टरी एक गोणी युरिया द्यावा. मध्यम खोल जमिनीमध्ये दीड ते दोन गोणी युरिया आणि अडीच गोणी स्फुरद द्यावे. भारी जमिनीस अडीच गोण्या युरिया आणि साडेतीन गोण्या स्फुरद द्यावे. कोरडवाहू जमिनीमध्ये संपूर्ण नत्र आणि स्फुरद दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.
८) बागायती क्षेत्रातील मध्यम खोल जमिनीमध्ये तीन गोण्या युरिया, पाच गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट व एक ते सव्वा गोणी म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. नत्र दोन हप्त्यांत, पेरणीच्या वेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्धे, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे.
कोळपणी महत्त्वाची…
१) रब्बी हंगामातील पिकांमध्ये कोळपणीचा महत्त्वाची आहे. एक कोळपणी केली म्हणजे पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. कोरडवाहू रब्बी ज्वारीमध्ये तीन वेळेस कोळपणी करावी.
२) पहिली कोळपणी पीक तीन आठवड्यांचे झाले असता फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे वाढणारे तण नष्ट करून त्यावाटे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो.
३) दुसरी कोळपणी पीक पाच आठवड्याचे झाल्यावर पासेच्या कोळप्याने करावी. त्या वेळेस जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सूक्ष्म भेगा पडू लागलेल्या असतात, त्या कोळपणीमुळे बंद होतात. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंद होते.
४) तिसरी कोळपणी पीक आठ आठवड्यांचे झाले असता दातेरी कोळप्याने करावी. दातेरी कोळपे मातीत व्यवस्थित घुसून माती ढिली करते आणि त्यामुळे भेगा बुजविल्या जातात. त्या वेळी जमिनीत ओल फार कमी असेल त्या वेळी आणखी एखादी कोळपणी केल्यास लाभदायी होते.