रब्बी हंगाम फायद्यात ! सलग चौथ्या वर्षी उच्च पातळी बंधारे तुडुंब

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

गोदावरी नदीवर पाथरी तालुक्यात येणारे ढालेगाव , मुदगल या हे उच्च पातळी बंधारे सलग चौथ्या वर्षी तर तारुगव्हाण उच्च पातळी बंधारा पाणी आढवल्या नंतर सलग तिसऱ्या वर्षी तुडुंब भरलेला आहे. येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकांना या पाण्याचा सिंचनासाठी वापर होणार असल्याने गोदाकाठच्या गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

पाथरी तालुक्यात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत निम्याने पर्जन्यमान झाले आहे . परंतु जायकवाडी धरण्याच्या वरील भागात असणाऱ्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने सप्टेंबर ऑगष्ट पासून चालू सप्टेंबर महिन्यात सतत गोदावरीत पाणी विसर्ग चालू असल्याने गोदावरी वाहती झाली आहे . मागील हंगामात जायकवाडी कालव्याला पाणी आवर्तने नियमित आल्याने उच्च पातळी बंधाऱ्यात असणारा पाणी साठा जुन महिन्यातही अर्ध्यावर होता.

यावर्षीही जुलै महिन्यापासूनच गोदावरी नदीवर उभारण्यात आलेले उच्च पातळी बंधारे यांचे दरवाजे उघडण्याची वेळ आली होती. आता परतीच्या पावसाने उसंत घेतली असली तरी जायकवाडी धरणातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू असल्याने तालुक्यातील ढालेगाव,तारूगव्हाण व मुद्गल उच्च पातळी बंधाऱ्यांमधून नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात येत आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस राहणार असली तरी त्यानंतर पाणी सोडणे बंद होईल.

सद्यस्थितीत ढालेगाव उच्च पातळी बंधारा 10.45 दलघमी ,तारूगव्हाण उच्च पातळी बंधाऱ्याममध्ये 11.38दलघमी तर मुदगल उच्च पातळी बंधार्‍यामध्ये 8.38 एवढा जिवंत पाणीसाठा झाल्याने सध्या गोदावरी पात्र पाण्याने तुडुंब भरलेल्याचे सुखद चित्र पाहायला मिळत आहे. तसे पाहिले तर ढालेगाव उच्च पातळी बंधारा पाणीसाठवण क्षमता 14. 87 दलघमी ,तारूगव्हाण उच्चपातळी बंधारा 15. 40 दलघमी व मुदगल उच्च पातळी बंधाऱ्याची 11. 87 दलघमी पाणी साठवण क्षमता असून लवकरच पूर्ण क्षमतेने उ.पा बंधारे शंभर टक्के भरलेले असतील.

आता या पाणीसाठ्याचा रब्बी हंगामामध्ये अंदाजीत 24 हजार 800 हेक्टर वर क्षेत्रावर पेरणी होणाऱ्या तृणधान्य , गळितधान्य व कडधान्य व बागायती उस केळी इत्यादी पिकांना सिंचनाद्वारे चांगले उत्पादन घेण्यासाठी फायदा होणार आहे .याच बरोबर या बंधाऱ्यामुळे पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा अंतर्गत आठ गावातील 1 हजार 33 हेक्टर , तारूगव्हाण बंधारा शेजारील आठ गावातील 1050 हेक्टर तर मुदगल बंधारा शेजारील सात गावातील 892 हेक्टर अशा एकूण 3 हजार 75 हेक्टर शेती क्षेत्राला उपलब्ध पाणीसाठ्याचा फायदा होणार आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *