सांगलीत पिकतोय महागडा काळा तांदूळ ; आसाममधून बियाणे मागवून जिल्ह्यात केला पहिलाच प्रयोग…

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, सांगली

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील पुनवत: सागाव येथील प्रगतिशील शेतकरी शशिकांत रंगराव पाटील यांनी शेतात ‘ब्लॅक राईस’ जातीच्या भाताचे पीक घेतले आहे. या भाताचे बियाणे त्यांनी आसाममधून मागविले आहे. एक वेगळा प्रयोग करत काळा भात पीक घेण्याचा हा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. मात्र परिसरात या भात पिकाचा विषय चांगलाच रंगत आहे..

शिराळा तालुक्यात खास करून भात शेती केली जाते. शशिकांत पाटील सात एकर शेतीत नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. यावर्षीच्या खरीप हंगामात पारंपरिक भात बियाणांपेक्षा नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी मित्रांच्या साहाय्याने आसाममधून ब्लॅक राईस हे २०० ते २५० रुपये किलो असलेले महागडे बियाणे मागविले.

ढोलेवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतात त्यांनी २३ मे रोजी या भाताची पेरणी केली. पेरणीतून उगवलेल्या रोपांतून त्यांनी बाजूच्या दुसऱ्या क्षेत्रात जुलै महिन्यात रोपलागण केली.पेरणी केलेल्या पिकापेक्षा लागणीचे पीक अधिक चांगले आहे. सध्या हे भात परिपक्व होत आलेले आहे.या भाताची लाबी आणि आतील तांदूळ काळ्या रंगाचा आहे. साधारण सात गुंठ्यांत घेतलेले हे पीक इतर भात पिकापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ चार-साडेचार फूट उंचीचे झाले आहे. या पिकासाठी त्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केला आहे.

शिराळा तालुक्यातील पोषक वातावरणात हा भाताचा प्रयोग यशस्वी ठरत असून यातून चांगले उत्पन्न मिळेल असा पाटील यांना विश्वास आहे.परिसरात या भात पिकाचा विषय चांगलाच रंगत आहे. हा तांदूळ खाण्यास पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. हा तांदूळ शिजण्यास वेळ लागतो.पण पौष्टिक असतो.या तांदळाची किंमत ही जास्त आहे.उत्पादक शेतकऱ्याला ही चांगला नफा मिळवून देते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *