सावधान ! लंपी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविणाऱ्यावर होणार कठोर कारवाई

हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. लंपी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लंपीरोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे.

सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे की, “लंपी चर्मरोग आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व नगर परिषद अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया) इ. चा वापर करून जनजागृती करावी अशा सूचना पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी-अधिकारी यांना दिल्या.

खासगी सेवादात्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

लंपी आजारावर उपयुक्त असणाऱ्या औषधींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी रू. १ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून लंपी चर्म आजारावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासीता छात्र (ईंटर्नीज) यांना प्रति लसमात्रा रु.3 प्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. सर्व खासगी सेवादात्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविणेचे श्री.सिंह यांनी आवाहन केले आहे.

ग्रामपंचायतीने कीटनाशकांची फवारणी करावी

शासकीय पशुवैद्यकांनी तसेच खाजगी पशुवैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत तक्रार असल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. पशुपालकांनी अशी तक्रार विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ वर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा रोग माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने कीटनाशकांची फवारणी करावी अशा सूचनाही यावेळी त्यांनी यावेळी दिल्या.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *