हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदणीसाठी साखर कारखान्यांकडे खेट्या मारण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. शेतकऱ्यांना गावशिवारात बसून ऊस नोंदविण्यासाठी शासनाने ‘महाऊस नोंदणी’ मोबाईल ऍप चालू केले आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत सोमवारी (२९) साखर आयुक्तालयात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या अॅप्लिकेशनचा प्रारंभ झाला.
यावेळी बोलताना साखर आयुक्त म्हणाले की, ‘‘महाऊस नोंदणी अॅप्लिकेशनमुळे राज्यातील शेतकऱ्यांना नोंदणीचे पूर्ण स्वातंत्र्य प्रथमच मिळत आहे. ४० लाख शेतकरी या उपक्रमात आणले गेले आहेत. शेतकऱ्याने एकदा नोंदणी करताच त्याचा ऊस कापून नेण्याची सक्ती आम्ही करणार आहोत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस बिननोंदणीचा किंवा बिगरकापणीचा राहणार नाही.’’
सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर संचालक उत्तम इंदलकर व यशवंत गिरी, सहसंचालक पांडुरंग शेळके, मंगेश तिटकारे व राजेश सुरवसे उपस्थित होते. ‘‘काही कारखाने ऊस नोंदी करीत नाहीत. त्यामुळे हतबल झालेले शेतकरी आमच्याकडे येतात. आम्हाला मध्यस्थी करून नोंदी करून घ्याव्या लागतात. त्यामुळे या समस्येची जाणीव मला आहे. आता थेट अॅप उपलब्ध झाल्यामुळे ही समस्या कायमची दूर होईल. या प्रणालीत काही अडचणी सुरुवातीला येऊ शकतात. मात्र, त्या दूर केल्या जातील,’’ असे सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अशी करा मोबाईलवर ऊस नोंदणी
1)सर्वप्रथम गुगल प्लेस्टोअरमधून ‘महाऊस नोंदणी’ (Maha Us Nondani) नावाचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे.
2)क्यूआर कोड स्कॅन केल्यास थेट डाऊनलोड करण्याची सुविधा आहे.
3)अॅप डाऊनलोड होताच ‘ऊस क्षेत्राची माहिती भरा’ या ठिकाणी बटण दाबावे. त्यानंतर ‘ऊस क्षेत्र नोंद करावयाच्या शेतकऱ्याची माहिती’ असा भाग दिसू लागेल. त्यामध्ये आपला भ्रमणध्वनी, आधार क्रमांक, पूर्ण नाव टाकावे. त्यानंतर ‘पुढे’ असे बटण दाबावे.
4)त्यानंतर ‘ऊस लागवडीची माहिती’ असा भाग दिसू लागेल. तेथे लागवडीचा प्रकार, उसाची जात, लागवड तारीख नमूद करावी. ऊस क्षेत्र गुंठ्यामध्ये भरावे. त्यानंतर ‘पुढे’ असे बटण दाबावे.
5)‘ऊस पीक उपलब्ध माहिती कोणत्या कारखान्याला कळवू इच्छिता’ असे दिसू लागेल. तेथे तीन कारखान्यांची नावे येतील. त्यात किमान एक व कमाल तीन कारखान्यांची नावे टाकता येतील. ती नमुद करून पुन्हा त्यानंतर ‘पुढे’ असे बटण दाबावे.
6)ही नोंद पूर्ण होताच शेतकऱ्याला ‘यानंतर आपणास धन्यवाद’ असा संदेश दिसू लागेल. त्यानंतर निवडलेले कारखाने शेतकऱ्याला स्वतःहून संपर्क साधतील.
यानंतर ‘साखर कारखान्यातील आपली ऊस नोंद पाहण्यासाठी’ असा भाग दिसेल. त्याठिकाणी आपण साखर कारखान्यात नोंदविलेला भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा. त्यानंतर ‘पुढे’ असे बटण दाबावे.
ही नोंदणी होताच अॅपमध्ये केलेली नोंद, कारखान्याने स्वीकारलेली नोंद आणि कारखान्याने नाकारलेली नोंद अशी सर्व माहिती शेतकरी पाहू शकतील.