हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील द्राक्ष बागायतदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागेस नुकसान झाल्यास विमा कवच शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे ठरते. यंदाच्या वर्षी द्राक्ष विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ निश्चित करण्यात आली आहे.
योजना द्राक्ष पिकासाठी अधिसूचित जिल्ह्यामधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे. या योजनेअंतर्गत नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर शासनामार्फत उभारलेल्या संदर्भ हवामान केंद्रावरील आकडेवारी गृहीत धरण्यात येते.
या योजनेअंतर्गत दोन वर्षे वय झालेल्या द्राक्ष पिकासाठी राज्याचे दोन भाग केले असून, त्या त्या भागानुसार हवामान धोके व नुकसान भरपाई रक्कम यात बदल आहे. द्राक्ष पिकास खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण निश्चित केले आहे.
द्राक्ष (अ) समाविष्ट जिल्हे ः नाशिक, नगर, धुळे, बुलडाणा
द्राक्ष (ब ) समाविष्ट जिल्हे ः सांगली, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, सातारा, बीड, लातूर, नांदेड, कोल्हापूर
टिप : विमाधारक शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे नुकसान झाल्यास ,नुकसान झाल्यापासून ७२ तासांचे आत नुकसानीची माहिती विमा कंपनीस / संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर नुकसानग्रस्त क्षेत्राचे वैयक्तिक पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण निश्चित केले जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता
हवामान धोके—विमा संरक्षित रक्कम रुपये प्रति हेक्टर—शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर
कमी तापमान,वेगाचा वारा, जादा तापमान—३,२०,०००—-१६०००
गारपीट—१०६६६७ —-५३३४
कोण घेऊ शकतो या योजनेत सहभाग ?
१) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.
२) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो , बँक पासबुक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
४) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे)
५) एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.
६) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येतो. मात्र विमा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्यांना ५ टक्क्यांपेक्षा जास्त विमा हप्ता भरावा लागतो.
७) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसानभरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.