महत्वाची बातमी ! ऊस वाहतुकीसाठी बैलांचे लसीकरण करणे बंधनकारक

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात जनावरांना होणाऱ्या लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून यावर्षीच्या ऑक्टोबर मध्ये सुरु होणाऱ्या गाळप हंगामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना लसीकरण करणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भांत बैल घेऊन जाणाऱ्या मजुरांच्या याद्या सादर करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

राज्यात ऊस गाळपासाठी हार्वेस्टर, वाहतुकीकरिता ट्रॉली यांचा वापर वाढला असला तरी अद्यापही बैलगाडी द्वारे उसाची वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. ‘लम्पी स्कीन’ रोगाचा प्रादुर्भाव काही भागांमध्ये दिसून आल्यामुळे सर्वच साखर कारखान्यांमधील कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक व शेती अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. आपापल्या साखर कारखान्याकडे बाहेरच्या जिल्ह्यातून बैलगाडीकरीता बैल घेऊन येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या नावांची गावनिहाय यादी अद्ययावत करा. ही यादी तातडीने संबंधित मजूर ज्या जिल्ह्यातून येणार आहेत त्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपआयुक्त पाठवा,” अशा सूचना आयुक्तांनी साखर कारखान्यांना दिल्या आहेत.

याबाबत बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की , “राज्याचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. त्यासाठी नेहमीप्रमाणे हजारो बैल विविध कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येतील. ‘लम्पी स्कीन’च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जनावराचे आरोग्यविषयक नियोजन महत्त्वाचे राहील. त्यामुळे कारखान्यांकडे बैल घेऊन येणाऱ्या मजुरांची यादी संबंधित जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे पाठविण्याच्या सूचना आम्ही राज्यातील सर्व साखर कारखान्यांना दिल्या आहेत. यामुळे लम्पी स्कीन रोग प्रतिबंधक लसीकरण काटेकोरपणे राबविण्यास मदत मिळेल.”

१५ ऑक्टोबर पासून सुरु होणार यंदाचा गाळप हंगाम

दरम्यान यंदाचा गाळप हंगाम हा येत्या १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याची माहिती आहे . याबाबतची घोषणा मुक्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (१९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर देण्यात आली. त्यामुळे गाळप हंगाम सुरु होण्याच्या तसेच लंपीच्या पार्श्वभूमीवर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांचे लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *