हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान गुजरात मध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘लंपी’ या जनावरांना होणाऱ्या रोगाने महाराष्ट्रातही एंट्री केली आहे. आजच्या लेखात आपण या रोगापासून आपल्या पशुधनाला वाचवण्यासाठी काय काळजी घ्यावी ? याची माहिती घेऊया. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी इथल्या तज्ञ व्यक्तींनी दिली आहे.
–लम्पी स्कीन डिसीज सदृश रोग गायवर्गीय व म्हैसवर्गीय पशूधनात दिसून येत आहे.
–हा साथीचा विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार मूख्यत्वे रक्त पिपासू चावणऱ्या किटकवर्गीय माशा, डास, गोचीडे यामूळे होतो.
–याच्या व्यवस्थापनासाठी रोग बाधीत पशुधन निरोगी पशुधनापासून विलगीकरण करावे अथवा त्यांना एकत्रित चरावयास सोडू नये.
–रोगबाधीत पशुधनाची ने आण बंद करावी.
— तसेच साथीच्या काळात गावातून/परिसरातून गोठयास भेटी देणाऱ्याची संख्या मर्यादीत करावी.
— बाधीत पशुधनाची सुश्रुषा करणाऱ्य पशुवैद्यक डॉक्टरांनी विशिष्ट पोशाख परिधान करावा व सुश्रूषेनंतर हात अल्कोहोत मिश्रीत सॅनीटायझरने धूवून टाकावेत तसेच पादत्राने व पोशाख, गरम पाण्याने निर्जंतूक करून घ्यावा.
–बाधीत पशुधनाच्या संपर्कामध्ये आलेले वाहन व परिसर तसेच ईतर साहीत्य निर्जंतूक करावे. रोग नियंत्रणासाठी रक्त पिपासू चावणाऱ्या किटकवर्गीय माशा, डास, गोचीडे यांचे निर्मुलन करावे.
–पशुधन व परिसरावरती रासायनिक/वनस्पतीजन्य किटकनाशकाची फवारणी करावी.
आजाराचा प्रसार
–बाधित जनावराच्या त्वचेवरील व्रण, नाकातील स्राव, दूध, लाळ, वीर्य, इ. माध्यमामार्फत हा आजार निरोगी जनावरात पसरतो.
–संसर्गजन्य असल्याने या विषाणूचा प्रसार हा बाधित जनावरांपासून निरोगी जनावरास स्पर्शाद्वारे सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे.
–साधारणतः ४ ते १४ दिवस हा कालावधी या आजाराचा संक्रमण कालावधी असतो. संक्रमण झाल्यानंतर १ ते २ आठवडे हा विषाणू रक्तामध्ये राहतो. त्यानंतर शरीराच्या इतर भागात त्याचे संक्रमण होते. त्यामुळे जनावराचे विविध स्राव, जसे डोळ्यातील पाणी, नाकातील स्राव, लाळ, इत्यादींमधून हा विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होऊन इतर जनावरांना या आजाराचा संसर्ग होते.
–त्वचेवरील खपल्यांमध्ये हा विषाणू अंदाजे १८ ते ३५ दिवस जिवंत राहू शकतो. वीर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोगाद्वारेही याचा संसर्ग होऊ शकते.
आजाराची लक्षणे
–हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो.
–सुरुवातीस २ ते ३ दिवस जनावरास बारीक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेन्द्रिय इ. भागात येतात.
–बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरे लंगडतात.
–निमोनिया व श्वसन संस्थेची लक्षणे आढळतात. डोळ्यांमधील व्रणामुळे जनावरांच्या दृष्टीत बाधा होऊ शकते.
–अशक्तपणामुळे जनावरांना या आजारातून बरे होण्यास बराच कालावधी लागतो.
उपचार
–हा आजार विषाणूजन्य असल्याने यावर खात्रीशीर उपचार होऊ शकत नाही. परंतु विषाणूजन्य आजाराची बाधा झालेल्या जनावरास प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर जिवाणूजन्य आजाराची बाधा होण्याची दाट शक्यता असल्याने जिवाणू प्रतिबंधक औषधी म्हणजे प्रतिजैविके देणे आवश्यक आहे.
–त्यासोबत ताप कमी करणारी औषधे, प्रतिकार शक्तिवर्धक जीवनसत्त्व अ व ई तसेच त्वचेवरील व्रणांसाठी मलमाचा वापर करणे गरजेचे आहे.
–वेदनाशामक व अँटि हिस्टॅमिनिक औषधांचाही आवश्यकतेप्रमाणे वापर करावा.
–जनावरास मऊ व हिरवा चारा व तसेच मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.
–तोंडातील व्रणास २ टक्के पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने धुऊन तोंडात बोरोग्लीसरीन लावावे. लिव्हर टॉनिकच्या वापराने जनावरे लवकर बरे होण्यास मदत होते.