सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरताना काय काळजी घ्याल? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये शेतीसाठी क्षारयुक्त पाण्याच्या अतिरीक्त वापरामुळे क्षारपड जमिनींचे प्रमाण वाढत आहे. त्याचे प्रमाण सर्वदूर पसरलेले असले तरी मुख्यत्वे ऊसाचे क्षेत्र आणि काळ्या जमिनीत ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते. क्षारयुक्त पाणी ठिबक सिंचनाद्वारे वापरल्यास ठिबक सिंचनाची विविध उपकरणे क्षार साठून खराब होतात किंवा त्यांच्या कार्यक्षमतेत घट होते. अशा स्थितीमध्ये एकूणच पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे अत्यावश्यक बनत चालले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने क्षारयुक्त पाण्याचा सिंचनासाठी वापर करताना काय काळजी घ्यावी याविषयी पुढील माहिती दिली आहे.

साधारणतः क्‍लोरीन, बायकार्बोनेट, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, सोडियम, बोरॉन व लिथियम यासारखे क्षार पाण्यात मिसळले जातात. निचऱ्याचा अभाव, पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग, रासायनिक खते व कीडनाशके यांचा वाढता वापर अशा अनेक कारणांमुळे पाणी क्षारयुक्त होते.

ओलीतासाठी पाण्याची प्रत 

पाण्याची प्रत आणि जमिनीचा पोत या दोन्हीचा संयुक्तपणे विचार करूनच ओलीतासाठी पाण्याची योग्यता ठरवली जाते. पाण्यातील क्षार, सोडियम व बोरॉनचे प्रमाण यावरून पाण्याची प्रत ठरवली जाते. क्षारांचे प्रमाण ०.२५ डेसी सायमन प्रति लीटर पेक्षा कमी असेल, पाण्यातील मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे गुणोत्तर प्रमाण १ पेक्षा कमी असेल, याशिवाय बोरॉन २ मिलिग्रॅम प्रति लिटर पेक्षा कमी असल्यास पाण्याची प्रत ओलीतासाठी चांगली असते.

क्षारयुक्त पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्याल?

जमिनीला साधारण उतार द्यावा. उताराच्या दिशेने खोल नांगरट करावी. शेतात उताराच्या दिशेने योग्य मशागत करावी. पिकांची लागवड वरंब्याच्या बगलेत करावी. पिकांमध्ये नियमित, वेळोवेळी उताराच्या दिशेने आंतरमशागत करावी. सेंद्रिय खतांचा तसेच हिरवळीच्या खतांचा जास्त प्रमाणात वापर करावा. रासायनिक खतांमध्ये नत्रयुक्त खतांचा शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त वापर करावा. सरीमध्ये पाचटाचे आच्छादन करावे. पिकांना वारंवार परंतु मर्यादित पाणी शक्यतो स्प्रिंकलरद्वारे द्यावे. पाटाचे पाणी उपलब्ध असल्यास खारवट पाण्यात ते ठराविक प्रमाणात मिसळून द्यावे. एक आड एक सरी भिजवावी. ठिबक संचाचा वापर पाण्यामध्ये विद्राव्य क्षारांची मात्रा ३.१२ डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा कमी असल्यास करावा. गहू, ज्वारी, ऊस, मका, सूर्यफुल, कापूस, सातू, शुगरबीट, पालक, लसूण घास यासारख्या क्षार सहनशील पिकांची निवड करावी. पाणी जास्त क्षारयुक्त, असेल तर निलगिरी, बांबू , सुबाभूळ इत्यादी वृक्षांची लागवड करावी.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *