कांदा उत्पादकांना मिळणार का दिलासा ? नाफेडमार्फत कांदा खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांचे पियुष गोयल यांना पत्र

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याचा दर घसरल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियुष गोयल यांना पात्र लिहिले आहे. याद्वारे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रिक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करण्यात यावी, अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.

काय आहे पत्रात ?

या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, कांदा हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून देशातील एकूण उत्पादनाच्या 35 ते 40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होतं. चांगल्या पावसामुळे कांद्याचं उत्पादन 2021-22 मध्ये 136.70 लाख मेट्रिक टन झाले, जे आधीच्या वर्षापेक्षा 20 लाख मेट्रिक टनाने जास्त होतं. एकंदरच बाजारपेठेतील किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये निराशा आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरलं आहे. एरवी श्रीलंकेकडून मोठ्या प्रमाणावर कांदा आयात होतो. मात्र, तिथल्या आर्थिक संकटामुळे या आयातीमध्ये देखील अडचणी आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सततच्या बदलत्या परिस्थितीमुळे आपल्याकडील शेतकऱ्यांना निर्यातीतून उत्तम किंमत मिळणं शक्य होत नाही.

केंद्र सरकारने देखील निर्यात उत्पादनावरील शुल्क आणि कर माफीच्या योजनेत दोन टक्क्यांऐवजी दहा टक्क्यांपर्यंत लाभ वाढवून द्यावा, अशी राज्य सरकारची विनंती देखील नाकारली आहे. आपल्या मंत्रालयाने या योजनेत 10 टक्क्यांपर्यंत लाभ दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायद्याच होईल. त्याचप्रमाणे सध्या नाफेडकडून कांदा खरेदी सुरु आहे ती आणखी 2 लाख मेट्रिक टनाने वाढवावी, अशी देखील विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नाफेडने यापूर्वीच 2.38 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी यावर्षी एप्रिल ते जून महिन्यात केली आहे. आणखी 2 लाख मेट्रिक टन खरेदी केल्यास कांदा उत्पादकांना किंमतीच्या बाबतीत दिलासा मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.

संदर्भ : एबीपी माझा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *