पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरु होऊ देणार नाही : राजू शेट्टी

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आम्ही एफआरपीपेक्षा जास्त ऊसाला दर मिळावा म्हणून भांडतो. परंतु तुमच्या सातारा जिल्ह्यात एफआरपी पेक्षा 100-200 रूपये दर कमी दिला जात आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता संघटित होणे गरजेचे आहे. तेव्हा सातारा जिल्ह्यात पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरू होवू देणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. नागठाणे (ता. सातारा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे एकरकमी एफआरपी व आले पिकांची एकत्रित खरेदी यासाठी ‘जागर’ सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

काटामारी शेतकऱ्यांच्या मुळावर

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, ‘काटामारी शेतकऱ्यांच्या मुळावर आली असून, ही रोखण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांप्रमाणे ऑनलाइन प्रणालीचा वापर कारखानदारांनी करावा, यासाठी शासनावर स्वाभिमानी दबाब वाढवेल. आले खरेदी करताना व्यापारी नवे- जुने करत आहे. ही पद्धत शेतकऱ्यांच्या नुकसानीची आहे. यासाठी सातारा, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणी सभा घेऊन एकत्रित खरेदी करण्यास भाग पाडणार आहे. यातूनही काही व्यापारी वाकड्यात गेल्यास त्यांची गाठ स्वाभिमानीशी आहे.

काटामारीतून होत असलेली साखर चोरीमुळे २२५ कोटींचा जीएसटी बुडविला जात असल्याचे संबंधित विभागाला निदर्शनास आणू दिले आहे. कारखान्यांनी काटामारीतून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुटले आहेत. ही लूट थांबविण्यासाठी साखर कारखान्यांनी पेट्रोलियम कंपन्यांप्रमाणे ऑनलाइन वजनकाटा बसविण्यासाठी सरकारवर दबाव आणणार आहे. आले व्यापाऱ्यांनी प्रचलित परंपरेनुसार आल्याची एकत्रित खरेदी करावी, अन्यथा स्वाभिमानीशी गाठ आहे, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य बाळकृष्ण साळुंखे, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जयकुमार कोल्हे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, देवानंद पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, अॅड. विजयराव चव्हाण, अॅड. सतीश कदम, कृषिभूषण मनोहर साळुंखे आदी उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *