हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, परतीच्या पावसानंतर आता भाजीपाला आणि फळबागांमध्ये देखील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
फळबागेचे व्यवस्थापन
१)संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
२)मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत पानामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असल्यास फवारणी न केलेल्या शेतकऱ्यांनी चिलेटेड झिंक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३)संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४)संत्रा/मोसंबी बागेतील रोगग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात.
५)डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
६) डाळींब बागेतील फुटवे काढावेत. बागेतील पडलेली फळे गोळा करून व रोग ग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात.
७)काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.
भाजीपाला
१)पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी.
२) मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी.
३)काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.